अहिल्यानगर :- श्रीरामपूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, तर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ.सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
नेवासा–संगमनेर मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी १ कोटी ३२ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
या पुतळ्याच्या उभारणीसाठी श्रीरामपूरकर शिवप्रेमींनी मागील अनेक वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. या कार्यात विविध लोकप्रतिनिधी व संघटनांनी योगदान दिले.
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर परिसरात “जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीरामपूर शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील एक अभिमानास्पद व स्मरणीय क्षण ठरला.


