Home जिल्हा बातमी बिबट पासून मनुष्याला धोका टाळण्यासाठी प्रभावी नियोजन सुरु..उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी...

बिबट पासून मनुष्याला धोका टाळण्यासाठी प्रभावी नियोजन सुरु..उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचा संवाद

0
11

कोपरगांव :- शहरालगत टाकळी चौफुली पासून पूर्व दिशेला काही अंतरावर बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात उसतोडणी कामगाराच्या लहान मुलीला मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे पडसाद जनसामान्यात सर्वत्र उमटले. या गंभीर विषयावर उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित, पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी संवाद साधून गोर-गरीब जनसामान्यांचा जीव स्वस्त नसल्याचे जनमानसातील विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे एक हजार पेक्षा जास्त बिबट असून कोपरगांव तालुक्यात सुमारे ४५ ते ६० चे पुढे संख्या आहे. काही वर्षापूर्वी वनक्षेत्रात आढळणारा बिबट हा शहरी वस्तीत दिसू लागला आहे. त्याची दोन मुख्य कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड आणि बिबटच्या खाद्याचे घटलेले प्रमाण कारणीभूत आहे. तसेच बिबट मादी ही दर दोन वर्षात प्रजनन होवून दोन ते चार पिल्लांना जन्म देते. त्यामुळे बिबट संख्या झपाट्याने वाढत आहे. गोदावरी नदी काठच्या कोपरगांव तालुक्यातील उस, मका यासह उभ्या पिकात बिबट रहिवास करतो आहे. तेथे जन्मलेल्या पिल्लांना लहानपणी उसाचे शेत हेच आपले निवारा ठिकाण वाटू लागते. त्यामुळे ते भविष्यातही तेथे किंवा परिसरात रमतात. त्यांची पुढची पिढी तेथे तयार होत आहे. शेळी, कुत्रा, डुक्कर यासह बिबट त्याच्या पेक्षा कमी उंचीच्या प्राण्याची शिकार करतो. रात्रीच्या वेळी शिकार करणारा निशाचर प्राणी म्हणून त्याला ओळखतात. त्याला शिकार मिळाली नाही तर मानवी वस्तीत लहान मुलांवर हल्ला करु शकतो. त्यात निष्पाप लहान मुलांचा बळी जातो आहे. अशा प्रसंगी जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे. नुकतेच जुन्नर, पुणे यासह कोपरगांव तालुक्यात शिंगणापूर येथील मोलमजुरी करणा-या दांपत्याचा काही दिवसांपूर्वी लहान मुलाला बिबट्याने उचलेले होते. तेव्हा त्या मुलाच्या आईने मोठ्या धाडसाने बिबट्याची शेपटी पकडून मुलाचे प्राण वाचवले. आठ दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेवून तो मुलगा दोन दिवसांपूर्वी सुखरुप घर आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना आहे. काल तीन वर्षीय मुलीचा बिबट्याने हल्लाने झालेला अंत पाहून माणूस म्हणून हृदय पिळवटून जाते.

अशा घटनेनंतर बिबट पिंजऱ्यात जेरबंद करणे. अधिक हिस्र बिबट यास ठार मारणे. हे झाले एक बिबटचे पण उर्वरित शेतातील उसात, पिकात लपलेल्या उर्वरित अंदाजे ४५ ते ६० बिबट्याचे काय करायचे. या अनुत्तरित विषयावर उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा. व. से.) यांचेशी पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी संवाद साधला आहे.

कालच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलीच्या पालकांना दहा लक्ष रुपये तत्काळ खात्यात आणि उर्वरित पंधरा लक्ष मदत लवकर होणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. तसेच शिंगणापूर येथील बिबट हल्ल्यात जखमी मुलाचा उपचार खर्च वन विभागाने केला आहे.

बिबटचा लहान मुले, माणसाला होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील वनविभागाने यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात अंतर्गत येणाऱ्या अडचणी समोर आल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्याने वनविभागाचे काही प्रस्ताव भारत सरकारच्या वनविभागाला दिले आहेत. तसेच नागरिकांनी काही उपाय सुचवले आहेत. त्यास मंजूरी आल्यावर बिबट संदर्भात प्रतिबंधक काम करतांना वनविभागाला सुलभ होणार आहे.

यात १) बिबट हे “वनतारा” सारखा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी बिबट नेवून सोडणे. किंवा महाराष्ट्र राज्यात तातडीने वनतारा सारखे प्रकल्प विभागीय स्तरावर उभे करावे.

२) बिबट हा वन्यजीव सूची क्रमांक १ वरुन सूची क्रमांक २ वर आणणे. ( बिबट जेरबंद करण्यासाठी मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना असणारे अधिकार शिथिल होवून उपवनसंरक्षक यांना प्राप्त होतील. बिबट जेरबंद प्रक्रिया सुलभ होईल.)

३) पिंज-यांची संख्या वाढवणे.(आवश्यक त्या ठिकाणी लावण्यासाठी)

४) काही बिबट यांची नसबंदी करणे.

५) बिबट यांना जी.पी.एस. बसवून त्याचा वावर असणाऱ्या परिसरात अलर्ट संकेत देणे.

६) वन्यजीव संरक्षण कायद्यात काही बदल करणे.
यातील काही प्रभावी बदल केंद्राकडून लवकरच अपेक्षित असल्याचे कळते. अनेक वर्षांपासून वनपरिक्षेत्र परिसर सह नैसर्गिक जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे. अजूनही होत आहे. ही थांबवून बेकायदेशीर वखारी यांचेवर छापे टाकून कारवाई होणे अपेक्षित आहे.

हे प्रभावी उपाय केंद्राचे मंजुरी येई पर्यंत नागरिकांनी आपल्या स्तरावर खालील काळजी घ्यावयाची आहे…👇
*वाघ व बिबट्याचे जीवशास्त्र…*
ग्रामस्थांनी याबाबत घ्यावयाची काळजी…

वाघ व बिबट्या मानवाला घाबरतो आणि साधारणपणे मानवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. वाघ व बिबट्या स्वतःचा प्रदेश परिचयाचा असतो. एका परिसरातुन वाघ व बिबट्या पकडल्यास दुसरा तरूण वाघ किंवा बिबट्या त्याची जागा घेऊ शकतो. अशी नवीन जागा त्याच्या परिचयाची नसल्याने संघर्ष वाढू शकतो.

*वाघ व बिबट्या प्रवण क्षेत्रात सावधगिरीने कसे वागावे…*

🐅 वाघ व बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका, मागे फिरा आणि त्याचा कधीहीं पाठलाग करू नका.

🐅अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नका, अंधारात एकटे फिरतांना, शौचाला जातांना, रात्री शेतात पाणी भरण्यास जातांना मोठ्याने गाणी म्हणा किंवा बरोबर मोबाईल मध्ये गाणे भरून मोठ्या आवाजात वाजवा.

🐅रात्री शेतात जातांना सोबत कंदील, बॅटरी, दणकट काठी ठेवा. अंधारात जातांना सोबत शिट्टी ठेवा व ठराविक अंतराने मोठ्याने वाजवा.

🐅 वाघ व बिबट्याने केलेल्या शिकारीच्या जवळ जावू नका. तो लपून बसलेला असू शकतो.

🐅पुरेसे खाद्य व राहण्यायोग्य वातावरण मिळाले तर वाघ व बिबट्या गावाजवळ राहू शकतो. पाळीव जनावरे, कुत्रे व डुकरे वाघ व बिबट्याला वस्तीकडे आकर्षित करतात. स्वतःचे नुकसान कमी करण्यासाठी आपल्या गुरांना बंदीस्त गोठ्यात ठेवा. रात्रीच्या वेळी गोठ्यात प्रखर उजेडाचा लाईट लावा. इतर वन्यप्राणी जसेः रानडुकरे, हणे, जंगली ससे हे सुध्दा वाघ व बिबट्याचे खाद्य आहे. त्यांचे शिकाऱ्यांपासुन संरक्षण करा.

🐅शेतकऱ्यांनी वाड्या-वस्त्यांवरून शेताकडे ये-जा करतांना आणि विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी परततांना एकट्याने न जाता समूहाने जावे.

🐅 सायंकाळनंतर निर्जनस्थळी जाऊ रेंगाळत राहू नये. शेतात वाकून काम करने शक्यतो टाळावे अथवा शक्य तेवढी सावधगिरी बाळगावी.

🐅 वाकून काम करत असतांना भक्ष समजून बिबट्या पाठमोरा हल्ला करण्याची शक्यता असते.

🐅शेतात काम करतांना गळ्याभोवती जाड स्कार्फ अथवा कापडं बांधावे. जेणेकरून बिबट्याने पकडण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षण होऊ शकेल.

🐅सायंकाळनंतर शिकारी प्राणी शिकारीस बाहेर पडतात. त्यामुळे यावेळी लहान मुलांना घराच्या अंगणात किंवा परिसरात एकटं सोडू नका.

🐅घराच्या बाहेर सायंकाळी आणि रात्री विजेचा दिवा सुरू ठेवावा. लाईट वारंवार जात असल्यास सोलर किंवा बॅटरीवरील दिव्याची सोय करावी.

🐅गुरे चरावयास जातांना समुहाने जाव. गुरांना एकटं सोडू नये. सायंकाळनंतर एकटं जाण्याची वेळ आलीच तर जवळ टॉचं बाळगावी. मोबाईल अथवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवत जावं.

🐅 हातात घुंगरू असलेली काठी वापरावी. अचानक बिबट्या समोर आल्यास शांत उभं राहावं. त्यास डिवचण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याचा पाठलाग करू नये. अशा वेळी स्वसंरक्षणार्थ तो हल्ला करू शकतो.

🐅 बिबट्या संदर्भात सोशल मीडियावर कोणतेही गैरसमज व अफवा पसरवू नयेत. रात्री घराबाहेर उघड्यावर झोपण, उघड्यावर शौचास जाणं टाळावं.

🐅घराजवळ कचरा साचवू नये, कचरा खाण्यासाठी कुत्रे, डुकरे असे प्राणी येतात. त्यामागे बिबट्या येण्याची शक्यता असते. घराजवळ दाट झाडं झुडपं वाढवू नयेतः यात लपून बसलेला बिबट्या सहज नजरेस पडत नाही.

🐅रात्री घराजवळ बिबट्या आढळल्यास फटाके वाजवून त्यास पळवून लावावं.

🐅उसाचे शेत हे बिबट्यासाठी लपण्यास उत्तम जागा असते. त्यामुळे कापणी करतांना अंतर्गत रस्त्यावरून जातांना विशेष काळजी घ्यावी. कापणीच्या वेळी पिल्ले / बछडे सापडल्यास त्यांना हाताळू नये. जवळच लपलेली मादी पिलांच्या संरक्षणार्थ हल्ला करण्याची शक्यता असते.

🐅 गांव स्वच्छ ठेवल्यास कच-यामुळे येणाऱ्या मोकाट कुत्रे व डुकरांची संख्या कमी होईल.

🐅आपल्या भागात तरस व बिबट्या दोघांचाही वाव असतो. तरस राखाडी रंगाचे असून त्यांच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. तर बिबट्या पिवळ्या रंगाचा असून त्याच्या सर्वांगावर काळे ठिपके असतात. या दोघातील हा फरक समजून घ्यावा.

🐅आपल्या परिसरात पट्टेरी वाघ नाहीत. आपल्या परिसरात बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस हे हिंस्र प्राणी आहेत.

🐅 याप्रकारे थोडिशी काळजी घेतल्यास आपला बिबट्याशी होणार संघर्ष टळू शकतो. वन्यजीव ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. बिबट्या दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरीत जवळच्या वन कार्यालयास माहिती द्या.

🐅 वन विभाग टोल फ्री क्रमांक 1926

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here