अहिल्यानगर, दि. १३
वादापेक्षा मनाची शांतता महत्वाची आहे. समाजात शांतता प्रस्तापित करणे व नाते संबंध टिकविण्यासाठी वाद समेटाने मिटविणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपली प्रकरणे सामंजस्याने मिटवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोशिएशन आणि सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. १३) राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन ज्येष्ठ पक्षकारांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी जिल्हा न्यायाधीश ए. एम. पाटील, जिल्हा न्यायाधीश सी. एम. बागल, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, सेन्ट्रल बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिवाणी तथा वरिष्ठ स्तर न्यायाधीश वाय.एस.पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. दिवाणी न्यायाधीश आर.आर. रहातेकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. के. एम. सोनवणे यांनी आभार मानले.
याप्रसंगी न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.