Wednesday, October 8, 2025
spot_img

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि.१६

अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीके, फळपीके, बंधारे, रस्ते, घरे, ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची श्री.विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. नुकसानीची माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, सायली पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे तसेच अक्षय कर्डीले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची, किराणा दुकानाची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. मौजे देवराई, मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेवगाव तालुक्यातील मौजे अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे लेखी निवेदन स्वीकारली.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झाला आहे. पावसामुळे नाले, ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. नागरिकांच्या घरांची, दुकानांचे तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. या पावसामुळे साधारणपणे १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे, असेही त्यांनी सांगितले.

पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles