बीड:-
अनेक दशकांपासून बीडच्या जनतेने प्रतीक्षा केलेली रेल्वे आज बीड येथून सुरू झाली असून, बीडकरांना ऐतिहासिक भेट देत रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडे, केशरकाकू क्षीरसागर यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा आदी उपस्थित होते.
*आजचा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा*
रेल्वे संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज हा दिवस शक्य झाल्याचे सांगुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “हा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू होणे म्हणजे फक्त गाडी पोहोचणे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचणे आहे. सन 2014 नंतर आमच्या सरकारने या प्रकल्पाला गती दिली. केंद्र व राज्याने 50 टक्के हिस्सा देत प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला. रेल्वेचे विद्युतीकरणही लवकरच पूर्ण होईल आणि यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगाने होईल.” असे ते म्हणाले.
*मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी वचनबद्ध*
मराठवाडा मुक्ती दिन आणि रेल्वे प्रकल्पाचा आनंद दुहेरी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पांना तब्बल 21 हजार कोटी रुपये दिले. ज्यामुळे विकासाच्या दिशा खुल्या झाल्या. सरकार मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी वचनबद्ध असून, पाण्याचे जाळे निर्माण करण्यासाठी कृष्णा व उल्हास खोऱ्यातील पाणी आणण्याचे मोठे प्रकल्प राबवले जातील.” असे त्यांनी सांगितले.
*बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय*
उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले की, आता जनतेचे प्रश्न सोडवायाचे आहेत. 30 ते 35 वर्षानी रेल्वेचे हे काम झाले आहे. या कामासाठी विलंब झाला आहे. यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुर्वीचा काळ व आजचा काळ यामध्ये मोठा फरक आहे. आज कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर होत आहे. ही रेल्वे पुणे आणि पुढे मुंबई पर्यंत घेवून जाण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील कोणतीही विकास कामे अडणार नाही याकडे लक्ष देण्यात येईल. रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले असून आता विमानतळाकडे आपले लक्ष आहे. जिल्ह्यात उद्योगपती आल्यास उद्योग स्थापन करुन रोजगार उपलब्ध होतील. बीडमधील गोरगरिबांना उपचारासाठी मुंबई-पुण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. यासाठी येथेच आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास करत असतांना त्यातुन मार्ग काढावा लागतो, असे सांगुन श्री. पवार म्हणाले, बीड जिल्ह्याच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. मोठ्या शहरातील रस्ते, मेट्रो, विमानतळ यासारख्या प्रकल्पाकडे लक्ष देत असतांना आमच्या ग्रामीण भागाचासुध्दा विकास झाला पाहिजे या दृष्टीने ग्रामीण भागातही रस्ते, दळणवळणासारख्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या रेल्वेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाचा, समृध्दीचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा दिवस मराठवाड्याच्या रेल्वेच्या इतिहासातील स्वर्णीम दिवस आहे. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
*राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी*
मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड येथे रेल्वेसाठी सर्व लोकप्रतिनीधीनी पुढाकार घेतला. रेल्वे ही नागरिकांच्या उन्नतीसाठी असणे आवश्यक आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्यात रेल्वे आली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा आणि स्वाभिमानी लोकांचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी दिला. बीडला रेल्वे यावी यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी आपलेही योगदान देण्याची तयारी आहे. जिल्ह्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कृपादृष्टी ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मिणा यांनी केले.
डॅशबोर्डचे उद्घाटन आणि बीड शहर पोलीस स्टेशनचे व 241 पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन
प्रारंभी मंचावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॅशबोर्डचे उद्घाटन आणि बीड शहर पोलीस स्टेशनचे व 241 पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी, विविध विभागाचे अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.