कर्जत व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून संयुक्त पाहणी
*अहिल्यानगर, दि. २४ -* कर्जत व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिके, शेतजमीन, ओढे, नाले व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन, खनिज व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिक, महिलांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता उत्तम धायगुडे, कार्यकारी अभियंता विनायक नखाते आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे चिलेवाडी व कुकडी डावा कालव्याच्या भागाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी संबंधित विभागांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
मलठण येथे पावसामुळे शेतपिके व शेतजमिनीचे झालेले नुकसान पाहण्यात आले. सीना नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तात्पुरती दुरुस्ती करून घेण्याचेही निर्देश दिले.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पहिल्यांदाच झाला असून त्याचा आपण समर्थपणे सामना करत आहोत. शासनाने या परिस्थितीला अतिशय गंभीरतेने घेतले आहे. नुकसानीच्या पंचनाम्यापासून एकही गाव सुटणार नाही व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचलेले असून अशा ठिकाणी ७/१२ वरील नोंदीनुसार सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
होलेवाडी व चिलेवाडी परिसरात असलेल्या जून्या तलावातील अतिक्रमणे काढावीत, तसेच गाळ काढण्याचे काम तातडीने करावे. परिसरातील पाझर तलावांची दुरुस्ती करावी. कुकडी कालव्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करावी, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गावकऱ्यांच्या मागणीनुसार पाडळ वस्ती व नवले-शिंदे वस्ती येथे पूल उभारणीसाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच छोटे लोखंडी पूल उभारण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिले.
तरडगाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , पुरामुळे मोठे नुकसान झाले असून ड्रोनद्वारे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. ७/१२ नोंदीनुसार सरसकट पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
निंबोडी येथे शेतपिकांचे नुकसान व शेतजमिनीची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्यात आला. सितपूर येथे सीना नदीवरील खडकत बंधाऱ्याचे नुकसान पाहून ग्रामस्थांशी संवाद साधला.
जामखेड तालुक्यातील मोहरी येथे पावसामुळे क्षतीग्रस्त झालेल्या तलावाची पाहणी करण्यात आली. तसेच धनेगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
*संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई*
पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले , अतिवृष्टीमुळे शेतपिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनो घाबरू नका. अशा संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतपीक, शेतजमीन व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील व मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. पावसामुळे वाहून गेलेल्या जमिनी, गाळ साचलेल्या विहिरी यासह सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ दोन दिवसांत विविध भागांची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा देणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री.देसाई यांनी सांगितल.