अहिल्यानगर– जामखेड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नुकसानीची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
प्रा. शिंदे म्हणाले , “नैसर्गिक संकटाच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने सामना करावा. एकमेकांना सहकार्य करणे हीच खरी ताकद आहे. प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठलीही जीवित वा पशुहानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी.”
सभापतींनी दरडवाडी येथे पुराने नुकसान झालेल्या पुलाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. मोहरी येथील तुटलेल्या तलावाचे निरीक्षण करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दिघोळ व जातेगाव येथे मांजरा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या शेतजमिनी, नुकसानग्रस्त घरे व घरातील वस्तूंची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रा. शिंदे यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, सर्व शेतपीक, जमीन, घरे, विहिरी, पशुधन आणि अन्य नुकसानीचे तातडीने व सरसकट पंचनामे करून मदत तत्काळ पोहोचवावी. कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अल्का अहिरराव, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार मच्छिंद्र ठाणके यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.