“
अहिल्यानगर, प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अलीम्को (ALIMCO) आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सेवा पर्व” अंतर्गत ३१५ दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले. हा भव्य कार्यक्रम डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पस येथील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकोळनेरचे ज्येष्ठ ह.भ.प. निवृत्ती बाबा शिंदे यांच्या हस्ते डॉ. सुजय दादांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुजय दादा म्हणाले, “साहित्य घरी नेल्यानंतर डोळे मिटून पांडुरंगाचे स्मरण करा. हे साहित्य देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारे विखे कुटुंब आणि गावाच्या हितासाठी प्रयत्न करणारे सरपंच प्रतीक शेळके यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. विखे परिवार सदैव जनतेसोबत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि ज्येष्ठांचा सन्मान हा आमचा धर्म आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, २०२२–२३ मध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार लोकांना वयोश्री योजने अंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप करून देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा मान येथे मिळाला आहे. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रात अंतर्गत मे २०२४ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान २७३७ लाभार्थ्यांना सुमारे १.७२ कोटी रुपयांचे साहित्य वाटप केले. तसेच, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून अडीच टीएमसी क्षमतेची हजार कोटी रुपयांची पाणी योजना लवकरच सुरू होणार असून, आकोळनेर परिसरातील कोरडवाहू शेतीचे रूपांतर हरित शिवारात होणार आहे.
“आपली खरी ओळख काम आहे. जनतेने योग्य मूल्यमापन करून शिक्षण, संस्कार व निश्चय असलेले नेतृत्व पुढे आणावे. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हीच वेळ आहे,” असे आवाहन डॉ. सुजय दादांनी उपस्थितांना केले.
या अंतर्गत ७५+ सामाजिक अधिकारिता शिबिरांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्या सहकार्याने तब्बल ३७५ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री व एडीप योजनेअंतर्गत सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ मिळत असल्याचे नागरिकांनी कृतज्ञतेने नमूद केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. पांडुरंग गायकवाड (महासचिव प्रभारी), ब्रिगेडीयर डॉ. अरुण त्यागी, डॉ. राम पडळकर, डॉ. श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे, केंद्र समन्वयक डॉ. दीपक अनाप, प्रशासकीय प्रमुख डॉ. अभिजित मिरेकर, अलीम्को डॉ. सृजन भालेराव व डॉ. प्रसाद काजळे यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे यांनी केले.
दरम्यान, “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या विविध विभागांनी सहभाग घेऊन नागरिकांची मोफत तपासणी केली व सामाजिक बांधिलकीची नवी ओळख निर्माण केली.